लोणीकंद पोलीस स्टेशनचा पोलीस आयुक्तालयात समावेश शहर पोलिसांच्या सर्व सुविधा मिळणार – आयुक्त अमिताभ गुप्ता
वाघोली प्रतिनिधी: अनेक दिवसांपासून पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत समाविष्ट होण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या लोणीकंद पोलीस स्टेशनचा मंगळवारी (दि.२३) अधिकृतरित्या समावेश झाला आहे. समावेशानंतर पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला भेट देऊन परिसराची पाहणी केली व माहिती घेतली. शहर पोलिसांच्या सर्व सुविधा मिळणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण हददीतील लोणीकंद व लोणीकाळभोर ही पोलीस स्टेशन त्यांची संपुर्ण हद्द, मनुष्यबळ व साधन सामुग्रीसह पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यासाठी सन २०१७ मध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी दर्शविलेल्या संमतीनंतर गृहविभागाने अधिसुचनेव्दारे पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग मधील परिमंडळ ४ मधील सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग या अंतर्गत लोणीकंद पोलीस स्टेशन व परिमंडळ ५ मधील सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अंतर्गत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन समावेश करणेबाबत अधिसुचना निघालेली होती. त्यानंतर सदर पोलीस स्टेशन हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश होण्यासाठी शहर पोलीस दलाकडुन कसोशीने प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी मंत्रालयीन स्तरावर तसेच इतर लोकप्रतिनिधी व प्रशासन स्तरावर बैठका तसेच पत्रव्यवहार करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः सातत्याने पाठपुरावा केला होता. १६ मार्च रोजी लोणीकंद व लोणीकाळभोर ही दोन पोलीस स्टेशन मनुष्यबळासह पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यास शासन मान्यता मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) ००.०१ पासुन दोन्ही पोलीस स्टेशन यांचा पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रात मनुष्यबळ व साधन सामुग्रीसह समावेश करून पुणे शहर पोलीस यांच्या अधिपत्याखाली कामकाज सुरु झाले आहे.
समावेशानंतर पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भेट देऊन पोलीस स्टेशनच्या आवाराची पाहणी करून माहिती घेतली. या भागातील वाहतुक कोंडी सुरळीत करणे, गुन्हेगारीला आळा घालणे, बीट मार्शल पेट्रोलिंगव्दारे नागरीकांना वेळेत मदत पोहोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत वेळेत आवश्यक मनुष्यबळ पोलीस ठाण्याचे मदतीसाठी पोहोचविणे, जास्तीचे मनुष्यबळ देणे व इतर सर्व सुविधा लोणीकंद हद्दीतही मिळणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपआयुक्त पंकज देशमुख, वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, मोटार परिवहन विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त आबासाहेब चिमटे, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, विनायक वेताळ उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
लोणीकंद पोलीस ठाण्यातून वाघोली पोलीस ठाण्याची निर्मिती लवकरच होणार आहे. पुणे शहर पोलीस दलातील स्मार्ट पोलिसिंग याठिकाणी अनुभवायास मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहर पोलिसांच्या तत्परतेचा निकाल दोन महिन्यामध्ये समोर येईल. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त
फोटो ओळ : लोणीकंद पोलीस स्टेशनला भेट देवून पाहणी करून माहिती घेताना पोलीस आयुक्त गुप्ता
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!