कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये होळी, धुलीवंदन साजरी करण्यास मनाई ; आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

पिंपरी चिंचवड :  कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा अगर रस्त्यावर होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्याचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत वैयक्तीकरित्या सुद्धा हा सण साजरा करणे टाळावे, असे आवाहनही आयुक्त पाटील यांनी केले आहे.

सध्या कोविड-19च्या वाढत्या आकडेवारी वरून कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सींग, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे याबाबींचा अवलंब करावयाचा आहे. कोविड–19 च्या पार्श्वभूमीवर साज-या होणा-या यंदाच्या होळी व धुलीवंदन(रंगपंचमी) सणामध्ये नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

व्यापक लोकहिताच्या दृष्टीने रविवार दि. 28 मार्च रोजी साजरा होणारा होळीचा उत्सव तसेच त्यापुढील दिवशी म्हणजे सोमवार 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन (रंगपंचमी) सणाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या उद्याने, मैदाने, शाळा आणि मालकीच्या जागी तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे होळी व धुलीवंदन तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

होळी व धुलीवंदन सण सार्वजनिक स्वरुपात साजरी करावयाचा नसल्याने या काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही.

कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी, संबंधित नियम याबाबत देखील महापालिका सहाय्यक आयुक्त तसेच क्षेत्रिय अधिका-यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करावी अशा सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

मास्क सुयोग्य प्रकारे परिधान न करणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर महानगरपालिका सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे दंडात्मक कारवाई करावी असे देखील आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 8 क्षेत्रिय अधिकारी पथके, 8 भरारी पथके तसचे 8 अंमलबजावणी पथके यांनी कडक कारवाई करावी असे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम त्याकरिता निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील.

कोविड-19च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिकेद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. सदर आदेश 24 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.