पिंपरी-चिंचवड उपमहापौरांच्या मुलासह ७० जणांवर गुन्हा
पिंपरी चिंचवड : उपमहापौरपदी निवड झाल्यानंतरचा जल्लोष साजरा करणे उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलाच्या अंगलट आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलासह ६० ते ७० जणांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल केलेल्या उपमहापौरांच्या मुलाचे नाव असून त्यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सुरक्षा परिवेक्षक दत्तात्रय बारकु भोर (वय ६०, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी पिंंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच पिंपरी – चिंचवड पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.दरम्यान, २३ मार्चला (मंगळवार) हिराबाई घुले यांची शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले हे त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र जमले. गर्दी करून घोषणाबाजी केली. यादरम्यान, सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!