पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकातील ७ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बढतीवर बदली झाल्याने त्या जागी एका पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या पथकातील संदीप गवारी, दिपक साबळे, अनंत यादव, संतोष अस्वले, महेश बारकुले, विष्णू भारती आणि मारोतराव जाधव यांची बदली करण्यात आलेली आहे. तर नियंत्रण कक्षातून पिंपरी येथे झालेली बदली रद्द करुन पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांची सामाजिक सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची पिंपरी चिंचवड पोलीस दलात सुरुवात केली. शहरातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, हा या पथकाच्या स्थापनेमागील उद्देश होता.
सामाजिक सुरक्षा पथकाकडून दररोज अवैध धंद्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या पथकाला बळ देता देता अचानक या पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!