बारमध्ये बिल देण्यावरून झालेल्या भाडणात माजी सैनिकाच्या कारचे नुकसान करणारा अटकेत, हडपसरमधील घटना

पुणे : खराडीमधील बारमध्ये बिल देण्यावरून मित्रांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हडपसरमध्ये मध्यरात्री आरोपीने माजी सैनिकाच्या कारची तोडफोड करून सोसायटीमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. २४ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली.

अनिकेत चांदोरकर (रा. प्रियदर्शन सोसायटी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी माजी सैनिक कालिदास मंडले (वय ५८, रा. प्रियदर्शन सोसायटी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेेत आणि फिर्यादी हे दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहतात. खराडीमध्ये बारमध्ये दारू पिल्यानंतर बिल देण्यावर दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आरोपी चांदोरकर याने मध्यरात्री सोसायटीमध्ये आल्यानंतर मंडले यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर चांदोरकर यांनी मंडले यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मंडले यांच्या कुटुंबीयांनी 100 क्रमांकावर माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, आरोपीने हल्ला केल्याने आम्ही घाबरलो असून, मुलाच्या जीविताला धोका असल्याचे मंडले यांनी सांगितले. पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे सोसायटीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पडसलकर पुढील तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.