‘मनाचिये डोही’ चारोळी संग्रह स्त्रीत्वाचे विविध अनुभव घेणारा मनाचा डोह – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर हे अर्वाचित काळातले दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्त्री आयुष्याच्या स्वातंत्र्याचा प्रवास आणि मनाच्या डोहात सुरू असलेल्या परिस्थितीचा भाव मोजक्या आणि सुरेख शब्दांत डॉ.मृणालिनी गायकवाड यांनी आपल्या ‘मनाचिये डोही’ या चारोळी संग्रहात मांडला आहे. स्त्रीत्वाचे विविध अनुभव घेणारा हा मनाचा डोह असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ.मृणालिनी पवार गायकवाड यांच्या ‘मनाचिये डोही’ या तिसऱ्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दृकश्राव्य पद्धतीने करण्यात आले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन वक्ते, प्राचार्य यशवंत पाटणे, प्रकाशक जयदीप गायकवाड, यशोदिप प्रकाशनचे रूपाली अवचरे, श्री निखील आणि पवार व गायकवाड कुटूंबस्नेही उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राज्यविकासाचा प्रवास यामध्ये  कविता, शाहिरांची गाणी, कादंबऱ्या, लेखन, चित्रपट यांचा जवळचा संबंध आहे. जे काही समाजात घडत असते त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. किंबहुना इतिहास घडविण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. मराठी भाषा ही शहरातील प्रमाण भाषेएवढीच ग्रामीण भाषेने जगवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशी मनिषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असून, साहित्य‍िक आणि वाचक या दोघांची समाजाला गरज आहे. त्यानेच पुस्तकाचे गाव आणि साहित्य जगणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

स्त्रीचे साहित्याशी नाते फार जुने आहे. डॉ. मृणालिनी यांच्या ‘इवलासा प्रवास’ या चारोळी संग्रहापासून ‘मनाचिये डोही’ या चारोळी संग्रहापर्यंतच्या प्रवासात स्त्रीयांचे कार्यविश्व साकारताना दिसत आहेत. स्त्रीयांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक विषयाला स्पर्श केल्याचे या पुस्तकात दिसून येत असल्याचेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. स्त्रियांनी लिहिते होण्याचा प्रवास आजही सोपा नाही, मात्र त्यांचे विचार जगासमोर मांडण्याची इच्छा असणे हेही महत्त्वाचे आहे असे सांगून त्यांनी प्रकाशकाचे अभिनंदन करून डॉ.मृणालिनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.मृणालिनी यांच्या चारोळीत समाजाचे दर्शन आणि शिक्षणाने स्त्रीच्या आयुष्यात आलेला बदल दर्शविला असल्याचे प्राचार्य यशवंत पाटणे यावेळी सांगितले. ते म्हणाले, पुरूषांच्या तुलनेत आजही स्त्रीयांना समान स्वातंत्र्य नाही. मात्र, तरीही हा खडतर प्रवास करीत त्या यशस्वी होत आहेत हे अभिनंदनीय आहे.

‘…आपलाच वाद आपल्याशी’ या तुकोबाच्या उक्तीप्रमाणे कवियीत्री या शब्द आणि त्यांनीच रेखाटलेल्या चित्रात रमताना दिसतात. या चारोळी संग्रहात वेदनेच्या पाऊलखुणा आणि उत्तुंग स्वप्न अनुभवायास मिळतात, असे प्राचार्य पाटणे यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन प्रा.कदम यांनी केले तर, प्रकाशक जयदीप गायकवाड यांनी आभार मानले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.