महाराष्ट्रभूषण उशिरा मिळालाय,पण आनंद आहे – आशा भोसले
मुंबई : पुरस्कार मध्यम वयात मिळालेले चांगले असतात. अगदी वृद्ध झाल्यानंतर पुरस्कार मिळतात, याला अर्थ नाही. मी 88 वर्षांची आहे. या वयात मी गाते, कार्यक्रम करते. पुरस्कार उशिरा मिळालाय, पण आनंद वाटतोय, अशी भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली.
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आशा भोसले यांनी आपल्या गाण्यांवर भरभरून प्रेम करणाऱया चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, आजवर मला खूप पुरस्कार मिळाले. पण महाराष्ट्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. अवघा हिंदुस्थान माझ्या गाण्यावर प्रेम करतो. पण महाराष्ट्र माझा आहे. इथल्या लोकांनी खूप सन्मानाने वागवलंय. अगदी जगभरातील मराठी माणसांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
त्या पुढे म्हणाल्या, सर्वात आधी मी श्री मंगेशाला हात जोडले. कर्ता करविता तोच आहे. त्याचे आभार मानले. आज या क्षणी खूप माणसं आठवतात. संगीत कारकीर्दीत मराठी, हिंदी, गुजराती अशी हजारो गाणी गायली. मराठीची गाणी माझी सगळ्यात चांगली आहेत, असे मला वाटते. वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार, सुधीर फडके अशा दिग्गज संगीतकारांची आज आठवण येतेय. त्यांनी माझ्याकडून गाणी गाऊन घेतली. त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवला आणि महाराष्ट्राच्या मनात माझी जागा झाली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!