अरेरे! मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

सोलापूर : सोलापूर येथे सख्या मोठ्या भावानेच सख्या लहान भावाची जागेच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूरातील कुमठानाका परिसरात शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश संगप्पा कुंभार असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे. या प्रकरणी भीमराव संगप्पा कुंभार (वय 43) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बझार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि भीमराव या दोघा भावांमध्ये जागेच्या मालकीवरून वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही भीमराव हा ती जागा माझ्या मालकीची आहे, मला दे, असा महेशकडे तगादा लावला होता. पण महेशने त्या जागेवर दावा सांगत जागा देण्यास नकार दिला होता. यातून दोघांत नेहमी भांडण होत होते. शुक्रवारी (दि. 26) सकाळी 10.30 वाजता भीमराव व त्याची पत्नी गीता कुंभार, मित्र संजय बनसोडे हे तिघे महेश कुंभारच्या घरामसोर आले. भीमरावने महेश याला तू बाहेर ये, तुला पेट्रोल टाकून जाळतो, असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ सुरू केली. यामुळे संतप्त झालेल्या महेश घराबाहेर आला. त्यावेळी भीमरावने महेशच्या अंगावर पेट्रोल टाकले तसेच महेशच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून बेदम मारहाण केली. रॉडचा घाव महेशच्या डोक्यात वर्मी बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. महेशच्या कुटुंबीयांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेशचा जबाबही नोंदविला. उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास महेशचा मृत्यू झाला. सदर बझार पोलीस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.