पुण्यातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला भीषण आग, अथक परिश्रमाने आग आटोक्यात, ८०० दुकानं जळून खाक

पुणे : पुणे शहरातील लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. ही आग तब्बल ३ तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल ८०० दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग नक्की कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली.

या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दहा दिवसांतील दुसरी घटना

लष्कर परिसरात आग लागण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून, आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटलाही भीषण आग लागली होती. त्यामध्ये मार्केटमधील चिकन व मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ फॅशन स्ट्रीट बाजारपेठही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, तेथील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कँटोन्मेंट अग्निशमन केंद्राच्या गाड्या उशिराने आल्या तसेच आग नियंत्रणात आणण्यात दिरंगाई केल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.