महापालिका कोणाच्या बापाची जहागीर नाही; सर्वसाधारण सभेत नगरसेवक संदीप वाघेरे आक्रमक

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महापालिकेने या पाच वर्षात सुमारे 30 हजार कोटींची कामे शहरात केली आहेत. मात्र दुर्दैवाने पिंपरी प्रभागातील विकासकामांचा निधी मिळविण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. महापालिका कोणाच्या बापाची जहागीर नसून स्थानिक भूमीपुत्रांच्या जीवावर ही महानगरपालिका उभी आहे, असा घणाघात भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला.

महानगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आपला संताप व्यक्त केला. वाघेरे म्हणाले की, शहराच्या नगरपरिषद ते महानगरपालिका या प्रवासात पिंपरी गावचा सर्वाधिक मोठा हातभार आहे. असे असूनही गेल्या 40 वर्षांपासून पिंपरी गाव असो किंवा विधानसभा मतदारसंघ असो हा कायमच वंचित राहिलेला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आजपर्यंत एकही चांगले नेतृत्व पिंपरीला मिळालेले नाही.

महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजना राबवितानाही वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरी, भोसरी व प्राधिकरणाचा काही भाग धरून मतदान घेण्यात आले. व हा प्रोजेक्ट चिंचवड मतदारसंघात गेला. या प्रोजेक्टसाठी पिंपरीतून 32 हजार मतदान झाले. मात्र ते कधी घेण्यात आले हे कोणालाच माहीत नसल्याचा टोला नगरसेवक वाघेरे यांनी यावेळी लगावला.

यावेळी ते म्हणाले की, 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजप पक्षाकडून मी निवडून आलो. त्यावेळी   महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मी 13 विकासकामे मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र महापालिकेकडून पिपरी ते काळेवाडी पर्यतच्या 15 मीटर डिपी रस्ता विकसित करणे या एकाच कामाला मंजुरी देण्यात आली. व उर्वरित 12 कामे ज्यांना प्रभाग क्रमांक 21 असे नाव होते ती नाकारण्यात आली.  मागील चार वर्षांपासून पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील विकासकामांसाठी मला सातत्याने संघर्ष करावा लागत आहे.

पिंपरी प्रभागावर जर असाच अन्याय करायचा असेल व संघर्षच जर आमच्या पाचवीला पुजलेला असेल. तर, पिंपरी गाव प्रभाग महानगरपालिकेतून वगळण्यात यावा, अशी संतप्त मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यावेळी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.