राज्य सरकारचं Mission Begin Again; आजपासून राज्यात जमावबंदी; रात्री 8 वाजल्यापासून ‘हे’ कडक निर्बंध लागू, गाईडलाईन जारी
मुंबई : शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने Mission Begin again अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे.हॉटेल, बार, सिनेमागृहसुद्धा रात्री आठ नंतर बंद होतील. या काळात होम डिलिव्हरी सर्व्हिस मात्र सुरू राहील.पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे. मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यास तातडीने दंड करण्यात येईल. या कुठल्याही नियमाचं पालन न करणाऱ्यांना जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कार्यालयांसाठीचे निर्बंध शक्य असेल त्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा देण्यात येण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. शिवाय नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळापत्रकाचं पालनही केलं जाणं अपेक्षित आहे. सदर ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणं अपेक्षित.
Disaster Management Act 2005 आणि Epidemic Diseases act 1897 या कायद्यांनुसार 15 एप्रिलपर्यंत हे नवे निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.
>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
>> मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
>> आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
>> सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई करमअयात आली. तसेच संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येील.
>> लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
>> अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येईल.
>> धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा
>> काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल. मात्र त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल.
>> घरीच विलगीकरण ( होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल तसेच गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.
>> कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल
>> खासगी आस्थापना ( आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील.
>> उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरु ठेवू शकते.
>> शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. बैठका आदि कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पाहावे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!