कोरोना लस घेताय? मग हे वाचाच..
आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत आणि ६० पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्यांना ही लस (corona vaccine) दिली जात होती. पण आता १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस (Covid 19 vaccine) दिली जाणार आहे. पण सरसकट सर्वांनाच कोरोना लस घेता येईल असं नाही.
काही जणांना विशिष्ट परिस्थितीत लस घेता येणार नाही.
कोरोना लस कुणाला घेता येईल आणि कुणाला नाही या संदर्भातील सविस्तर माहिती:
डायबेटिक असाल तर:
डायबेटिज हा कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारात गणला जातो. अशांना कोरोनाची लागण लवकर होते आणि झाल्यावर रुग्णाची तब्येत गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे. १ मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षावरील वयाच्या कोमोर्बिड आजार असलेल्या व्यक्तींना हे लसीकरण उपलब्ध आहे. ६० वर्षांच्या वरील व्यक्तींनी आपलं नाव नोंदणी करून लस घ्यावी. ४५ ते ५९ वर्षे वयाच्या व्यक्तींना नाव नोंदवून घ्यावं आणि लसीकरणाला जाताना आपल्या डॉक्टरांकडून विहित नमुन्यातले सर्टिफिकेट घेऊन जाणं आवश्यक आहे.
हार्ट अटॅक येऊन गेलाय:
हृदयविकाराचा झटका येणं हे देखील कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारामध्ये मोडतं. त्यामुळे लसीकरण नक्कीच करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबतीत वरीलप्रमाणेच नियम आहेत.
बायपास सर्जरी झालीये:
बायपास शस्त्रक्रिया हृदयविकारामध्येच केली जात असते. हा आजारही कोमॉर्बिड आजारांमध्ये येत असल्याने जरूर लसीकरण करून घ्यावं.
पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर:
पॅरालिसिस म्हणजेच लकवा किंवा अर्धांगवायू. या आजाराचा समावेश कोमॉर्बिड आजारात होतो. त्यामुळेच त्यांनीही लसीकरण करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबत वरीलप्रमाणेच नियम आहेत.
कोरोना पोजिटिव होऊन १५ दिवसांनी बरे झालाय:
ज्यांना कोरोनाची लागण होऊ गेली आहे, अशांनी त्यातून बरे झाल्या दिवसानंतर ४५ दिवसांनी लसीकरण करून घ्यावं.
गरोदर स्त्रियांनी:
सध्या १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या लशींच्या चाचण्या सुरू होत आहेत. त्या चाचण्यांमध्ये ती लस या वयोगटाला सुरक्षित आहे असं लक्षात आल्यावरच त्यांचं लसीकरण होऊ शकेल. हीच गोष्ट गरोदर स्त्रियांची आहे. गरोदर स्त्रियांना जेव्हा त्यांच्यासाठी सुरक्षित लस संशोधित होऊन उपलब्ध होईल तेव्हाच त्यांचं लसीकरण होऊ शकेल.
लस घेताना खाऊन जायला हवं का?
लस घेण्यापूर्वी किमान ३ तास आधी काही खाऊन जावं. उपाशी पोटी कोणतीही वेदना सहन करण्याची शक्ती कमी असते. लशीचं इंजेक्शन घेताना जरी फारच कमी दुखत असलं, तरी उपाशीपोटी लस घेऊ नये.
नेहमीच्या ब्लड प्रेशर ,डायबेटिसच्या गोळ्या घेऊन लस घेता येईल?
लस घ्यायला जाताना बीपी, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराच्या गोळ्या आपल्या नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यात.
लस घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
आपल्या देशात कोरोनाच्या ज्या लस दिल्या जात आहेत, त्याने कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स होत नाहीत. लस घेताना किंचितसं दुखतं, दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्या जागी दंडावर सूज येते. ती दोन-तीन दिवसानंतर आपोआप कमी होते. काही व्यक्तींना दोन दिवस ताप येतो, अंग-हातपाय दुखतात, खूप गळून गेल्यासारखं वाटतं. मात्र ही लक्षणंही दोन-तीन दिवसात त्वरित कमी होतात.
क्वचित प्रसंगी काहींना लस घेतल्यानंतर गरगरतं, पण त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवलं जातं. काही इतर त्रास झाल्यास डॉक्टर्स आणि उपचाराची सोय असते. कोरोनाची लस घेतल्यावर भारतात आजपर्यंत एकही गंभीर घटना घडलेली नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.
लस घेतल्यानंतर जर ताप आला तर काय कराल?
लस घेतल्यावर १०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप आल्यास पॅरासिटेमॉलची ५०० मिलिग्रॅमची एक गोळी घ्यावी. मात्र ताप येईल म्हणून लसीकरणाआधी ती मुळीच घेऊ नये.
एकदा लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का?
कोरोनाची लस ही एम-आरएनए पद्धतीची आहे. ती घेतल्यामुळे कोरोना होत नाही. मात्र पहिला डोस घेतल्यावर १५ दिवसांनी त्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंडे तयार होऊ लागतात. त्यानंतर शरीरात ५० टक्के प्रतिकार शक्ती येते. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तो घेतल्यानंतर १५ दिवसांनी शरीरात एकूण ९५ टक्के प्रतिपिंडे तयार होतात. याचाच अर्थ लस घेतली तरी आपण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो, तर पहिल्या १५ दिवसात बाधा होण्याची शक्यता १०० टक्के असते, १५ दिवस ते ४३ दिवस या काळात ही शक्यता ५० टक्के असते. त्यानंतरही पुढे बाह्य संसर्गामुळे कोरोना होण्याची शक्यता ९५ टक्के असते.
कोरोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम १ वर्ष टिकतो असं सध्या सांगितलं जात आहे. याचा अर्थ एक वर्षानंतर बाह्य संसर्गामुळे पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही.
लस घेतल्यानंतर शारिरीक कष्टाची कामं करता येतील?
आपल्या रोजच्या कामांना हरकत नसते. शारीरिक कष्टाची कामं असल्यास किमान दोन-तीन दिवस तब्येतीचं निरीक्षण करावं लागतं. ताप, अंगदुखी असे त्रास असल्यास शक्तीची कामं होऊ शकत नाहीत. साहजिकच किमान तीन दिवस कामावरून रजा घ्यावी.
लस घेतल्यानंतर स्तनपान करू शकतो का?
ज्या महिलांना एक वर्षाचे बाळ आहे आणि ज्या त्यांना स्तनपान करतात, अशा मातांनी लस घेऊ नये. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना फारशा स्पष्ट नाहीत. मात्र मातेने लस घेतल्यावर त्याचा अंश तिच्या दुधात उतरतो. त्याचा परिणाम बालकांवर काय होतो यावर संशोधन झालं नसल्याने सध्यातरी एक वर्षापर्यंत वयाचे बाळ असलेल्या स्त्रियांनी लस घेऊ नये.
लस घेतल्यानंतर लगेच प्रवास करू शकतो का ?
लस घेतल्यानंतर काही व्यक्तींना गरगरू शकतं. त्यापुढील ३ ते ७ दिवसात ताप येणं, अंग दुखणं, मळमळणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे लस घेतल्यावर किमान आठवडाभर खूप लांबच्या प्रवासाला लगेच जाऊ नये. आपल्या गावातील अत्यावश्यक कामांसाठी आपण फिरू शकता. आपल्या कामाला जायलाही हरकत नसते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!