परमबीर सिंग यांच्या त्या आरोपासाठी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर भष्च्राचाराचे गंभीर आरोप केले. या आरोपांप्रकरणी गृहमंत्र्यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत. यावर चौकशी व्हावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. आता यासंदर्भात अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.
आपल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी जे आरोप केले होते त्या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे चौकशी करण्यात येणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. आज (२८ मार्च) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती.
गृहमंत्र्यांनी तेल ओतले
मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. सिंग हे महत्त्वाकांक्षी अधिकारी आहेत. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
तर फडणवीसांचीही चौकशी करावी
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यात आघाडीवर आहेत. फडणवीस हे बेछूट आणि बेलगाम आरोप करीत असून सातत्याने खोटे बोलत आहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रीय तपासणी यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीसांचीही चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
अनिल देशमुख बदलीबद्दल काय म्हणाले होते?
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. या बाबी माफ करण्यासारख्या नाही आहेत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. ही नियमित प्रशासकीय बदली नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिसांकडून चुका झाल्याची स्पष्ट कबुली दिली होती.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!