महाविकास आघाडीत कुणीही मीठाचा खडा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये, अजितदादांनी राऊतांना फटकारले
बारामती : ‘राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले’, असं जाहीरपणे लिखाण करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. पण, ‘महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारून काढले आहे.
आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलाच इशारा दिला.
‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्ष वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये, असं म्हणत अजित पवार यांनी राऊत यांना बजावलं.
तसंच, संजय राऊत यांना चांगले माहित आहे. राष्ट्रवादीमधये शरद पवार हेच निर्णय घेत असतात. शरद पवार यांनी या राज्याचे मुखयमंत्री कोण असावे, हे काँग्रेससोबत आघाडी असताना ठरवले आहे. असं एकंदरीत वातावरणात काम करत आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, असंही अजितदादांनी राऊत यांना फटकारलं.
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत –
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!