नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीसंदर्भात आराखडा तयार करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : राज्य शासनाने गेल्या काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्यास परवानगी दिली आहे. ही महाविद्यालये कोणत्या पध्दतीने बांधण्यात यावीत, हे काम किती काळात पूर्ण होईल याबाबत एक आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रोजेक्ट मॉनिटरींग सिस्टीम युनिटची बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे काम पीपीई (सार्वजनिक खाजगी तत्वावर)मॉडेल, हायब्रिड ॲन्युटी किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांच्याकडून वित्तपुरवठा या कोणत्याही पध्दतीने नियोजन करीत असताना यामधील बारकावे शोधण्यात यावेत. या सर्व तत्वांचा अभ्यास करीत असताना याला अंतिम स्वरुप देण्याचे काम करुन लवकरच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचे सादरीकरण करण्यात यावे.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी कोणत्या पध्दतीने महाविद्यालय स्थापन करता येऊ शकेल याबाबतचा आराखडा तयार करावा असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी आज दिले
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!