कोविड विरोधातील लढाईत लढणाऱ्या प्रत्येकाच्या कामाबाबत अभिमान आणि समाधान – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : कोविड विषाणूचा महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला विळखा बसला आहे. या विषाणूविरोधातील लढाईत लढणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या कामाबाबत अभिमान आणि समाधान आहे. अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे अधिष्ठाता, डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना या विषाणूविरोधातील लढाईसाठी बळ दिले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील सर्व अधिष्ठाता यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, उपसचिव संजय सुरवसे यांच्यासह सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

अधिष्ठातांनी अधिक सतर्क राहावे

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोविड विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. रुग्ण हाताळताना कोणतीही चूक परवडणारी नसून प्रत्येकाचा जीव वाचवणे यालाच प्राधान्य असणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी अधिक सजग राहून कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी.

लसीकरणावर भर द्यावा

येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने देण्याबरोबरच प्रत्येकाचे लसीकरण करुन घ्यावे. आपल्या सर्वांनाच महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडमुक्त करावयाचा असून यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आपले योगदान द्यावे. यापुढील काळात आणखी दक्ष राहून रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेत कोविडविरोधातील युध्द जिंकण्यासाठी सज्ज व्हावे. येत्या काळातही राज्यातील अधिष्ठाता, डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देतील, अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.

परीक्षेबाबत संभ्रम नको

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेसंदर्भातील परिपत्रक काढले असून सर्व अधिष्ठाता यांनी त्यांच्या महाविद्यालयात हे परिपत्रक सूचना फलकावर लावावे. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 24 जून नंतर होणार असून इतर सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.