लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत चर्चा सुरू असते. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध आणत आहोत, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.  यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं बेडचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र सगळीकडेच अशी परिस्थिती नाही असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं. काही ठराविक भागांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. असा ठिकाणिी बेड मिळण्यासाठी अडचणी येत आहेत असं सांगताना त्यांनी मुंबईचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, मुंबईत आयसीयुचे बेड ४०० , ऑक्सिजन बेड २०००, व्हेंटिलेटर बेड २१३ आहेत, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचंही टोपेंनी सांगितले.

बेड्स अपुरे पडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचंही राजेश टोपेंनी सांगितले. ते म्हणाले की, बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय इतर गरजेचं साहित्य उपलब्ध करून दिली जाईल. तसंच ज्या अडचणी आल्या होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. लसीकरणाचा वेग पाहता लवकरच हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि कोरोनाचं प्रमाण कमी होईल अशी आशाही राजेश टोपेंनी व्यक्त केली. सोशल डिस्टन्सिंगसाठी नियोजन केलंच जातं. लोक असेच वागणार असतील तर निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगण्यात आलं आहे. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा असंही आवाहन टोपेंनी केलं.

राज्यात लॉकडाऊन होणार का? असे विचारले असता अद्याप लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं राजेश टोपेंनी सांगितलं. लॉकडाऊबाबत चर्चा सुरु असते पण सध्या आहेत ते निर्बंध कठोर करण्याचं नियोजन केलं जात आहे. गरज पडल्यास कठोर पावले उचलली जातील, लोकांना त्यादृष्टीने मानसिकता ठेवावी. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यासाठी नियोजन सुरु आहे. त्याबद्दल अंतिम निर्णय झाला की सांगण्यात येईल असंही टोपे म्हणाले.

टोपे म्हणाले की, शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे एडमिट केलं आहे. पोट दुखण्याचे कारण पित्तनलिकेच्या मुखाशी खडा निर्माण झाला होता, त्यामुळे त्रास होत होता. एंडोस्कोपीने  तो खडा काढला आहे.  अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. आता ते स्टेबल होत आहेत.  चार ते पाच दिवसाने डिस्चार्ज करता येईल.

जल्लोष परवडणारा नाही

औरंगाबादमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मागे घेण्यात आला. त्यानंतर औंरगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. हे योग्य नाही आणि सध्याच्या परिस्थितीत परवडणारं नसल्याचं राजेश टोपे म्हणाले. गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं गरजेचं आहे. इम्तियाज जलील माझे मित्र आहेत ते नक्कीच या गोष्टीचं भान ठेवतील असं टोपेंनी सांगितलं.

काल राज्यात 27,918 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली.  राज्याच्या आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळं 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण मात्र अडचणीत आणणारं ठरत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.