आयसीआयसीआय बँकेचे कर्जफेडीनंतरही पैशाचा तगादा, निवृत्त शिक्षकाने शिकवला चांगलाच धडा
हडपसर;कर्जाची संपूर्ण रक्कम आदा केल्याचा ना-देय दाखला देऊनही पुन्हा त्याच रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या आयसीआयसीआय बँकेला जिल्हा ग्राहक न्याय मंचाने चांगलाच दणका दिला आहे. न्यायमंचाने तक्रारदार कर्जदाराला नुकसानभरपाई पोटी पंचवीस हजार रुपये देण्याचा आदेश बँकेला दिला आहे. साडेसतरानळी येथील निवृत्त शिक्षक काळुराम जगताप यांनी आयसीआयसीआय बँकेच्या मगरपट्टा शाखेतून तीस हजार रुपये वैयक्तीक कर्ज घेतले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये जगताप यांनी संपूर्ण कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर बँकेकडून त्यांना ना-देय दाखलाही देण्यात आला होता. मात्र, दोन महिन्यानंतर बँकेचे प्रतिनिधी, वसुली प्रतिनिधी थकीत रक्कम नसतानाही तक्रारदारास वेळोवेळी वसुलीसाठी फोन करून त्रास देत होते. त्यामुळे तक्रारदार जगताप यांनी बँकेस नोटीस पाठवून होत असलेल्या त्रासाबाबत भरपाईची मागणी केली होती. बँकेकडून त्याची दखल न घेतल्याने तक्रारदाराने जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे आपले गाऱ्हाणे मांडले. मंचाने त्यावर तक्रारदार जगताप यांना पंचवीस हजार रुपये देण्याचा आदेश बँकेला दिला आहे. तक्रारदाराचे वतीने अॅड. श्रीराम करंदीकर यांनी काम पाहिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!