तिरुपती मंदिरात दान केल्या जाणाऱ्या केसांची चीन, म्यानमार, थायलंडमध्ये तस्करी; टीडीपी नेत्याच्या आरोपांनी खळबळ

 

दक्षिणेतील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत देवस्थानात तिरुपती बालाजीची गणना होते. तिरुपतीच्या दर्शनासाठी देश, विदेशातील लाखो लोक दरवर्षी रांग लावतात. या ठिकाणी देवासा केस दान करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र भक्तांनी दान केलेल्या केसांची विदेशामध्ये तस्करी केली जाते असा खबळजनक आरोप आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते अयन्ना पत्रुदू यांनी केला आहे.केसांच्या तस्करीमध्ये सत्ताधारी पक्ष वायआरएस काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप देखील अयन्ना पत्रुदु यांनी केला आहे. तिरुपती मंदिरात दान केले जाणारे केस म्यानमार, थायलंड आणि चीनला विकले जात असल्याचा आरोप टीडीपीनं केलाय. ‘नवभारत टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

तिरुपती मंदिरामध्ये दान केलेल्या केसांची विदेशामध्ये तस्करी केली जाते आणि यात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे अनेक नेते सहभागी आहेत, असा गंभीर आरोप तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते अयन्ना पत्रुदू यांनी केला आहे. तस्करीद्वारे दान केलेले केस चीन, म्यानमार आणि थायलंडला पाठवले जातात असा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिझोराम-म्यानमार सिमेवर तैनात आसाम रायफल्सच्या पथकाने 2 कोटी रुपयांचे मानवी केस जप्त केले होते. याचा हवाला देत तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते अयन्ना पत्रुदू यांनी तिरुपतीला दान केल्या जाणाऱ्या केसांच्या तस्करीचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील बेकायदेशीर तस्करीचा भांडाफोड झाला आहे. तसेच यातून हेच स्पष्ट होते की सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे नेते वाळू, सीमेंट आणि दारुसोबतच मानवी केसांच्या तस्करीची माफियागँग चालवत आहेत, असा आरोप पत्रुदू यांनी केला.

टीडीपीचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तस्करी केलेले केस म्यानमारला आणि तिथून पुढे प्रक्रिया करण्यासाठी थायलंड किंवा चीनला पाठवले जातात. या केसांचा वापर विंग बनवण्यासाठी केला जातो आणि याचा व्यापार जगभरात पसरलेला आहे, असा आरोप तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते अयन्ना पत्रुदू यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना स्पष्टीकरणही मागितले आहे. रेड्डी सरकार केसमाफियांवर अंकुश लावण्यास अपयशी कशी ठरली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिंदू भक्तांच्या भावनांना ठेस

“भक्तांनी दान केलेल्या केसांच्या तस्करीला मदत करुन वायआरएस काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुंच्या भावना दुखावण्याचं काम केलं आहे. जगभरातून लाखो भाविक येथे येत असतात. देवावरील श्रद्धेपोटी ते आपले केस दान करत असतात. पण सत्ताधारी पक्षाचे नेते मंदिराच्या प्रतिमेला ठेच पोहोचविण्याचं काम करत आहेत”, असं पत्रुदु यांनी म्हटलं आहे.

 

विश्वस्त्रांनी आरोप फेटाळले

दरम्यान, मंदिराच्या विश्वस्तांनी तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते अयन्ना पत्रुदू यांचे आरोप फेटाळले आहेत. ट्रस्टचे अधिकारी एव्ही धर्म रेड्डी यांनी पत्रुदू यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. भक्तांनी दान केलेल्या केसांच्या साठवणुकीसाठी, प्रक्रियेसाठी, हाताळणीसाठी आणि वाहतुकीसाठी एक योग्य पद्धत बनवण्यात आलेली आहे. या केसांचा दुरुपयोग होत नाही आणि येथे गडबडही होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.