मोठा निर्णय : पुण्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र निर्बंध कडक केले जाणार!

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत होती. त्यामुळेच आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील एकूण कोरोना स्थितीचा आढावा घेण्य़ासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यात राज्यात लॉकडाऊन केला जाणार की निर्बंध कडक केले जाणार यावर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. तर दिल्लीतही आज एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात या बैठकांनंतर काय निर्बंध लावले जाणार? की काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

संध्याकाळी 6 नंतर शहरात संचारबंदी?

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्यापासून चर्चा सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र असा निर्णय झाल्यास पुणेकरांना संध्याकाळी 6 नंतर अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडता येणार नाही.

पुण्यातील गंभीर स्थिती

पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.

शहरात कोरोनाचा संसर्गात झपाट्याने वाढ होत असून सोसायटीच्या इमारतीत मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे शहरात एकूण 268 कंटेन्मेंट झोन तयार झाले असून यामध्ये 115 इमारती तर 111 सोसायटी यांचा समावेश आहे.

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना संसर्ग कसा आटोक्यात आणायचा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे आगामी काळात आणखी कडक निर्बंध केले जाण्याची शक्यता आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.