आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत दोन टँकर चालकांकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

पिंपरी चिंचवड: भर रस्त्यात दोन टँकर उभे करून एकमेकांसोबत बोलत असलेल्या टँकर चालकांना दुचाकीचा होर्न वाजवून टँकर बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 31) रात्री जाधववाडी चिखली येथे घडली.

रामकृपाल धुरणसिंग मरकाम (वय 25), शुभम सुरेश बोराटे (वय 27, दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत रुपेश दिगंबर यादव (वय 27, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल मधून औषधे आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते जाधववाडी येथील ऐश्वर्यम हमारा माढा सोसायटी येथे आले असता दोन्ही टँकर चालक आरोपी टँकर भर रस्त्यात उभे करून एकमेकांसोबत बोलत होते. त्यावेळी यादव यांनी दुचाकीचा होर्न वाजवून टँकर बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने ‘आम्ही गाववाले आहोत, तुझ्याकडे बघतो’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी रामकृपाल याने लोखंडी रॉडने तर आरोपी शुभम याने लाकडाने मारून फिर्यादी यादव यांना जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.