ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनऊमध्ये अटक

लखनौ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमिल अहमद शेख यांच्या हत्येचा खुलासा यूपी एसटीएफने केला आहे. एसटीएफने आरोपी शुटर इरफानला लखनौमधील कठौता तलावाजवळून अटक केली आहे.

टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचे नाव इरफान सोनू शेख मनसुरी असे असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याला सोमवारी (5 एप्रिल) ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

आरोपी इरफान सोनू हा गोरखपूर जिल्ह्यातील गुलरीहाच्या खीरियाचा रहिवासी आहे. शनिवारी दुपारी लखनऊमध्ये यूपी एसटीएफने त्याला अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तांमार्फत उत्तर प्रदेश एसटीएफच्या महासंचालकांना अटकेसाठी विनंती करण्यात आली होती. मनसे नेत्याची हत्या केल्यानंतर इरफान उर्फ ​​सोनूने गोरखपूरमध्ये लपून बसला होता. आरोपी लखनौमध्ये असल्याची माहिती यूपी एसटीएफला मिळाल्यानंतर सापळा लावून एसटीएफने त्याला अटक केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. मुख्य आरोपीने अटक केलेल्या आरोपींना दोन लाखांची सुपारी दिली होती. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याचाच शोध पोलीस घेत आहेत. आरोपीने जमील यांची सुपारी का दिली याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.