हडपसरमध्ये दहशत पसरविणाऱ्या शुभम कामठेच्या टोळीवर ‘मोक्का’ ; पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका
पुणे : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भर दिला आहे. त्यानुसार गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला जात आहे.हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठी दहशत पसरविणार्या शुभम कामठे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीतील चार जणांस अटक करण्यात आली आहे.
दत्ता भिमराव भंडारी (वय – 24, रा. पापडेवस्ती, हडपसर), सौरभ विठ्ठल घोलप (वय – 22, रा. काळेपडळ, हडपसर), ऋतिक विलास चौधरी (वय – 21, रा. पापडेवस्ती, हडपसर), साहिल फकिरा शेख (वय – 21, रा. पापडेवस्ती, हडपसर), शुभम कैलास कमाठे (रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) व त्यांच्या दोन साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. टोळी प्रमुख शुभम कामठे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रोहन इंगळे मित्र अभिषेक व रोहित हे 17 फेब्रुवारीला फुरसुंगीत नवीन फोन विकत घेण्यासाठी जात होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन कामठे टोळीतील दत्ता भंडारी व इतरांनी रोहन याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते.याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. टोळीप्रमुख शुभम कामठे अजूनही फरार आहे.
टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार चव्हाण यांनी त्याला मंजूरी दिली असून त्याचा सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते तपास करीत आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मोक्का कारवाई झाली असून या वर्षातील हि 16 वी कारवाई आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!