या कारणातून झाला सराईत गुन्हेगार सुमीत जगतापचा खून

पुणे : पुर्वी झालेली भांडणे व वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरुन महिलेसह चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून सराईत गुंडाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री आठच्या सुमारास लोहगावमधील विमानतळानजीक घडली.  याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने महिलेसह तिघांना अटक केली, तर विमानतळ पोलिसांनी एका आरोपीस बेड्या ठोकल्या.

सनी गाडे,शबनम हनीफ शेख (वय 35, रा. भुकन वस्ती, लोहगाव), महंमद हुसेन महंमद शरीफ कुरेशी (वय 33) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय 32, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली.तर सुमीत दिलीप जगताप (वय 33, रा. कलवड, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत जगताप सराईत गुंड होता. त्याचे लोहगाव परिसरातील लेडी डॉन नावाने परिचित असलेल्या शबनमसोबत जुने मैत्रीचे संबंध होते. परिसरातील अवैध व्यवसायात शबनमने जम बसविला होता. त्यातून दोघांमध्ये नेहमी वादावादी होत असे. गेल्या काही महिन्यापासून सुमीत शबनमला सातत्याने त्रास देत होता. संबंधीत महिलेसमवेत सुमीतचे काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.

ही भांडणे मिटविण्यासाठी शनिवारी संबंधीत महिला व तिच्यासमवेत चौघेजण शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोहगावमधील खेसे पार्क येथे जमले होते. तिथे चौघांनी सुमीतला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखीच वाद वाढले. सुमीतने महिलेस मारहाण केली. या प्रकारामुळे चिडलेल्या आरोपींनी लाकडी दांडक्‍यासह धारदार शस्त्रांनी सुमीतवर वार केले होते.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास सुमीतचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर महिलेसह चौघेजण पळून गेले. त्यावेळी विमानतळ पोलिसांनी या घटनेतील प्रमुख आरोपी सनी गाडे यास अटक केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. त्याचवेळी संबंधित घटनेमध्ये शबनम शेख व तिचे साथीदार यांचा सहभाग असून ते खडकी येथील शासकीय दूध योजनेसमोरील रस्त्यावर “लेडी डॉन’ असा उल्लेख असलेल्या कारमध्ये थांबले आहेत. ते तिथून लवकरच पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींना अटक करुन विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे सुमीतवर हल्ला करण्याबाबतची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी संबंधीत महिला व सुमीतमध्ये पुर्वी झालेली भांडणे मिटविताना पुन्हा झालेल्या वादातून हा खून घडल्याची कबुली दिली.  खुनाच्या घटनेनंतर लगेचच गुन्हे शाखेने आरोपीना तत्काळ अटक केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले. तिन्हीही आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.