अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा ; मुख्यमंत्र्यांना भेटून देणार राजीनामा

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना : नवाब मलिक

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, “उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पवारांनी यासाठी होकार दिला आहे. सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला.”

 

 

राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिका निकाली काढत 15 दिवसांत सीबीआयला प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  

मात्र परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब सीबीआयने प्राथमिक चौकशी अहवाल देतानाच आताच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडीला धक्का समजला जात आहे. 

न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा व घराण्याचा मान राखत कारवाई करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.