गौरव पासलकर टोळीवर मोक्का कारवाई, पोलीस आयुक्तांचा धडाका कायम
पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कारवाईचा धडका कायम असून वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करून दहशत निर्माण करणाऱ्या गौरव पासलकर टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीतील दोघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.
गौरव सुरेश पासलकर (वय – 22, रा. श्रमिक कॉलनी, वारजे), मंगेश विजय जडीतकर, पल्लू कमलेश चौधरी आणि राजू लक्ष्मण गेहलोत अशी मोक्काची कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यापैकी चौधरी व गेहलोत यांचा शोध सुरू आहे.
वारजे माळवाडी येथील गोकुळनगरमधील वसुधंरा सोसायटी येथे १३ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गौरव पासलकर व त्याच्या तीन साथीदारांनी विकास विष्णु जानावळे (वय २६, रा. वारजे माळवाडी) यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले होते. तसेच त्याच्या खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. कोयत्याने मारहाण केली होती.
याप्रकरणात गौरव पासलकर आणि मंगेश जडीतकर यांना अटक करण्यात आली होती. तपासामध्ये पासलकर हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्या अधिपत्याखाली तो इतर साथीदारांना घेऊन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पासलकर याच्या टोळीवर दरोडा, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशिर घरात घुसणे, शस्त्राचा धाक दाखवून धमक्या देणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. डॉ. शिंदे यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्ह्याच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कडक कारवाई करण्याबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासंबधी सुचना केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही २३ वी कारवाई असून या वर्षातील ही मोक्काची १७ वी कारवाई आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!