“पत्रकारांनाही लवकर लस द्या”; मित्राच्या निधनानंतर आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एएनआय वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं कोरोनामुळे मुंबईत निधन झालं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली आहे. तसेच, भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो. त्यामुळे १८ ते ३५ या वयातील तरुण पिढीचे कोरोना लसीकरण करा, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. भाजपचे नेते राम कदम यांनीही याआधी सरकारकडे ही मागणी केली होती.
यासंबंधीचं एक ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, ‘आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती.’
आव्हाड पुढे म्हणाले की, ‘पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो, असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे.’
पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे.@OfficeofUT
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 5, 2021
ANI च्या पत्रकाराचं निधन
एएनआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ANI mourns the death of our colleague Sabaji Mohan Palkar, a video journalist in Mumbai who fought a valiant battle against Covid, but succumbed yesterday. As a front-line worker, you brought to the world India’s fight against Covid. We are with your family in grieving your loss. pic.twitter.com/B3sW3XCOy8
— ANI (@ANI) April 5, 2021
आरोग्य मंत्रालयानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत एक लाख ३ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जणांनी कोरोनावर मात केली. देशभरात सध्या सात लाख ४१ हजार ३० रुग्ण उपचाराधीन आहेत. तर एक लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!