रस्त्यात खड्डे, कि खड्ड्यात रस्ता.
कामशेत;कामशेत ते वडीवळे या जवळपास पाच ते सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी हा रस्ता दोन्ही बाजूला खचला आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली पाहायला मिळत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. या मार्गावर सतत दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. वडीवळे गावच्या रस्त्याला सुरुवात होताच खड्ड्यांची सुरुवात होते.
वडीवळे गावाला जाताना इंद्रायणी नदीवर पूल लागतो. संबंधित पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका आहे. शिवाय याठिकाणी मोठे खड्डे देखील पडलेले आहेत. त्यापुढे वडीवळे येथील संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा मोठे खड्डे पडलेले पाहायला मिळतात. शिवाय यामार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर आडव्या चरीचे खड्डे पडले आहेत, सततच्या वाहनांच्या वर्दळीने या चरीदेखील खोल झाल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने जोरात आपटून गाड्यांचे नुकसान होत आहे.
इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलाच्या मध्यभागी देखील खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे नागरिक वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवीत आहेत. शिवाय रस्त्याच्या मध्यभागीच मोठे खड्डे पडल्याने खड्डा चुकवायचा की गाडी खड्ड्यात घालायची असा प्रश्न वाहनचालकांना पडतो आहे. कामशेत कडून वडीवळे गावाकडे जाताना भुयारी मार्गाचे काम देखील सुरु आहे हे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांना वडीवळे कडून कामशेत ला येण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागतो.
कामशेत ते वडीवळे या पाच ते सात किलोमीटर लांबीच्या प्रवासात वाहनचालकांना अनेक खड्ड्यांचा सामना करीतच प्रवास करावा लागतो. वडीवळे गावात वाहन चालक पोचल्यावर वाहन चालक सुटकेचा नि:श्वास टाकत आहेत. प्रवाशांनाही या मार्गावर जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. संबंधितांनी या मार्गावरील पडलेले खड्डे बुजवावेत अशी वाहन चालकांतून व नागरिकांकडून मागणी होत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!