अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

जयंती समन्वय समितीचा ‘ ब्रेक दि चेन’ ला प्रतिसाद; प्रथा-परंपरेनुसार जयंती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित व्यापक बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

बैठकीत जयंती समन्वय समितीच्या वतीने १४ एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आय़ोजन केले जाईल. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जाईल आणि राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दूरदृश्य प्रणाली माध्यमातून आयोजित या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व  राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार राहूल शेवाळे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, मुंबईचे पोलीस आय़ुक्त हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी यांच्यासह मध्य रेल्वे, बेस्ट आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जयंती समन्वय समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, भदंत बोधी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत. पण विषाणूने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीतकमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्वक केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांचे इंदूमिल स्थित स्मारकाचे काम थांबू दिलेले नाही. तेथील पुतळ्याची उंची आणि अनुषंगिक गोष्टींना गती दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबिरांचे आयोजन करता येईल. पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे, हे ध्यानात ठेवून या शिबिरांचे आयोजन करावे लागेल. त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

जयंती समन्वय समितीने जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वीकारलेल्या समंजस भूमिकेचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, ब्रेक दि चेनच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन व यंत्रणा यांना सर्व सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी झालेल्या चर्चेत गृह राज्यमंत्री श्री. पाटील, खासदार श्री. शेवाळे यांच्यासह जयंती समन्वय समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला व महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

जंयतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.