१०० कोटी वसुलीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत तर अनिल देशमुख दिल्लीत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. दरम्यान, काल (५ एप्रिल) या प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले, त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला. अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याचा कारभार सोपवला. सोमवारी राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांनी दिल्ली गाठली. हायकोर्टाच्या आदेशाला अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी आज सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सीबीआय(CBI) मुंबईत येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे १५ दिवसांत १०० कोटी वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत जर काही तथ्य आढळलं असेल तर सीबीआयला FIR नोंद करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत.

काय होता परमबीर सिंगाचा आरोप?

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.