अहमदनगरमध्ये पत्रकाराचे अपहरण करून दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला

अहमदनगर: राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी समोर आली आहे. राहुरी परिसरातील मल्हारवाडी रस्त्यावरून मंगळवारी दुपारी  स्कार्पियोमधून अपहरण करण्यात आले होते.गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या का झाली याची याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार व  दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर घराकडे जात असताना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची काल दुपारी अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलीस ठाण्यात रोहिदास दातीर यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि गाडीचा शोध सुरू केला होता.

दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत.

दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अनेक वेळा दातीर यांच्यावर हल्ला झाला होता.

राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दातीर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोड वरील एका हॉटेल इमारत या विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला होता. काही प्रकरणांचे खटले औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, याचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.