पुण्यात थरार! सासरी राहण्यासाठी येत नसल्याच्या रागातून पत्नीचा भररस्त्यात चाकूने वार करत खून , भेकराईनगर परिसरातील घटना

पुणे : पत्नी सासरी राहण्यासाठी येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.7) सकाळी साडेनऊच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात घडली. आरोपी पतीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी हडपसर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शुभांगी सागर लोखंडे (वय 21, भेकराईनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाळू लोखंडे (वय 23,रा. उरळी देवाची,मुळ विजयवाडी अकलुज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी रेणूका राजू हनवते (वय 37,रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनूसार सागर व शुभांगी दोघांचाही दुसरा विवाह आहे. एक वर्षापुर्वीच त्यांचा विवाह झाला होता. शुभांगी सासरी नांदत असताना सागर दारु पिऊन नेहमी तीला त्रास देत होता. ती नेहमी आजारी असल्याने सागरच्या त्रासाला कंटाळून अनेकदा माहेरी रहायला येत होती.सध्याही सागरचे दारुचे व्यसन वाढल्याने ती माहेरी आली होती.

बुधवारी सकाळी ती आई व मावशी सोबत कामाला चालली होती. यावेळी तीघींना सागरने भेकराईनगर येथील शिवशक्‍तीनगर चौकात गाठले. तेथे त्याने शुभांगीला घरी येण्यास सागितले.त्यावरुन त्यांच्यात रस्त्यातच वाद सुरु झाला. त्यावेळी सागरने सागरने अचानक जवळ लपवलेला चाकू काढून तीच्या पोटात खुपसला. गंभीर जखमी झाल्याने शुभांगी जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी सागरला पकडून चोप दिला. यानंतर पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या शुभांगीला उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.