हाफकीन मधील संसर्गजन्य रोग संशोधन केंद्र निर्मितीसाठी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि अणुऊर्जा सचिवांसोबत मुख्य सचिवांची बैठक
मुंबई : येथील हाफकीन इन्स्टिट्युटमध्ये संसर्गजन्य रोगाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ.विजय राघवन आणि अणुऊर्जा विभाग सचिव के.एन. व्यास यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.
मुख्य सचिव कुंटे म्हणाले, राज्य व देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी हाफकीन संस्थेच्या उल्लेखनीय योगदानाचा समृद्ध इतिहास आहे. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की महाराष्ट्रासह देशाचा पश्चिम भाग प्लेग, स्वाईन फ्लू इत्यादि संसर्गजन्य आजारांना मोठ्या प्रमाणात बळी पडला आहे. हाफकीन संस्थेमध्ये संसर्गजन्य रोगाचे उत्कृष्ट संशोधन केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची इच्छा असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळेल. अणुऊर्जा विभाग व केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या सहकार्याने या संशोधन केंद्राच्या निर्मितीला गती द्यावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी यावेळी केले.
बैठकीत डॉ.राजेंद्र बडवे यांनी विशेष अत्याधुनिक संस्था स्थापन करण्याबाबत सादरीकरण केले, ज्यामध्ये मूलभूत संशोधन व अभ्यासपूर्ण संशोधन असे दोन्ही विषय असतील. संस्थेच्या स्थापनेच्या दिशेने अंमलबजावणीसाठी एक कृती समिती गठित करण्याचा निर्णय झाला. केंद्र शासनाचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव श्री.व्यास ह्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवत सहकार्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकीन संस्थेच्या संचालक श्रीमती सीमा व्यास, हाफकीन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पेडणेकर, आयसीटी मुंबईचे कुलगुरू श्री. पंडित आणि टीआयएफआरचे संचालक रामकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!