कोरोनाचा पहिला डोस घेऊनही सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला होता. आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर, पोलिस उपायुक्तांसह काही नगरसेवकांना कोरोनावर मात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही नुकतीच कोरोनावर मात करून पुन्हा ड्यूटी जॉईन केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सातत्याने लोकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क येतो. वारंवार बैठकांचे आयोजन करून नागरिकांना व त्यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना कराव्या लागतात. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोनदा कोरोनावर मात करीत पुन्हा काम हाती घेतले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही कोरोनावर मात करून ड्यूटी जॉईन केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील आमदार प्रशांत परिचारक, यशवंत माने, प्रणिती शिंदे यांनीदेखील कोरोनावर मात केली आहे. आता आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून ते उपचार घेत आहेत. दुर्दैवी घटना म्हणजे ज्येष्ठ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, आमदारांनाही कोरोनाची बाधा होऊन ते बरे झाले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!