देशात लसीकरण पूर्ण होईपर्यत, परदेशात पाठवू नका – अजित पवार

पंढरपूर : लसीच्या वाटपाच्या आकडेवारीमुळे वाटप करताना केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचे दिसले होते. काल वाटप केलेल्या साडेतीन कोटी लसीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त साडेसात लाख लसी आल्या आहेत. एप्रिल अखेर महाराष्ट्रातील लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने केलेले असताना पुरेशी लस मिळणे अपेक्षित आहे. लसीचा तुटवडा असेल तर महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय परदेशात लस पाठवू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांनी केंद्र शासनाच्या लस वाटपावर ही टिपण्णी केली.

‘लस वाटपाचे केंद्राचे धोरण विचित्रच आहे महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी, लसीचा पुरवठा साडेसात लाख, हरियाणाची लोकसंख्या आपल्या निम्मी देखील नाही त्यांना वीस लाख लसीचे डोस दिले आहेत. कोरोना हा लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे यात आम्हाला राजकारण करायचे नाही केंद्राने करू नये पुण्यात आम्ही रोज एक लाख लोकांना लस देण्याचे नियोजन केले आहे लसच पुरेशी नसेल तर कसं काम करणार, एप्रिल अखेर पर्यत 45 वर्षाच्या वरील सर्व लोकांना लस देण्याचे राज्यशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी केंद्राने मागणी प्रमाणे लस उपलब्ध करुन द्यावी.’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

देशातील वितरणात लस कमी पडत असेल तर देशातील लसीकरण पूर्ण होईपर्यंत परदेशात जाणारी लस थांबवावी. देशातील लसीकरण झाले की परदेशात लस पाठवा, आपण इथे उपाशी असताना दुसऱ्याचे पोट भरण्याची घाई नका, असा टोला पवार यांनी लगावला.

अजित पवारांची भाषणाची अशी स्वतःची खास शैली आहे. त्यांची हीच खास शैली यंदा पंढरपूरच्या प्रचारातही चांगलीच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर, पंढरपुरातील अजित पवारांचे एक भाषण गाजत आहे. अजित पवार आपल्या या भाषणात म्हणत आहेत की “आपलं नाणं खणखणीत हाय, कारण आपल्या माग चुलता उभा हाय. शरद पवार साहेब. आणि ते कायम माझ्या पाठीशी उभे राहणार ह्याची मला खात्री हाय.” अस्सल गावरान भाषेत शरद पवारांचा उल्लेख करत अजित पवारांनी केलेले हे भाषण प्रचंड गाजत आहे.
अजित पवारांनी याचवेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर बोचरी टीका करण्याची संधीही सोडलेली नाही. “ज्यांचं बारामतीमध्ये दोनदा डिपॉझिट जप्त झालं ते इथे येऊन तुमच्या पुढे भाषण करत आहेत. हर्षवर्धन पाटलांचा पराभव तर आमच्या दत्ता मामा भरणेंनी केला आणि आता ते तुमच्याकडे येऊन मतं मागतायत”, असा जोरदार टोला अजित पवारांनी आपल्या या भाषणात लगावला आहे.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.