कामशेत मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर

कामशेत;कामशेत परिसरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. कामशेत मधील पंडित नेहरू विद्यालयाच्या समोरच कचऱ्याचा ढीग अक्षरशः हनुमानाच्या शेपटीसारखा लांबतच चालला आहे. शिवाय शासनाने प्लास्टिकबंदी करून देखील या कचऱ्यात प्लास्टिक चे प्रमाण अधिक पाहायला मिळते.

कामशेत ही सत्तर गावांची बाजारपेठ असल्यामुळे येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कामशेत शहरामध्ये रोज शेकडो टन कचरा निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे ग्रामपंचायतीपुढे मोठे आव्हान आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यास मोठी समस्या सुटेल, पण त्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्लास्टिक बंदी घोषित केल्यापासून अनेक नागरिकांनी कापडी पिशवी वापरण्यास सुरुवात केली. मात्र अजूनही काही नागरिक बिनधास्त पणे प्लास्टिक पिशवी व कॅरिबॅग वापरताना दिसतात.

प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांवर व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत नागरिक व दुकानदार याबाबत गांभीर्याने घेणार नाहीत असे चित्र दिसत आहे. घरामधून निघणारा हा कचरा नागरिक परिसरातील रस्त्यांच्या कडेला फेकतात. ग्रामपंचायत कर्मचारी घंटागाडीमधून कचरा गोळा करतात, पण कामावर जाणारे बरेचसे नागरिक जाता जाता कचरा ढिगांवर टाकतात. या कचऱ्याच्या ढिगावर बेवारस कुत्री ताव मारताना दिसतात.

कामशेत मधील कचऱ्याच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढून कामशेत ला कचरा मुक्त करून स्वच्छ करावे असे मत मनोज जगताप यांनी व्यक्त केले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.