पुण्याला थेट केंद्राकडून लस मिळालेचा महापौरांचा दावा फोल, ​तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल मानले होते पंतप्रधानांचे आभार 

पुणे :  कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात देखील इतर शहरांप्रमाणे लसीचा तुटवडा जाणवतोय. असं असताना पुण्याला केंद्र सरकाकडून थेट दोन लाख 48 हजार डोस पाठवण्यात आल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला होता.. कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर​​ तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेे होते.प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील इतर शहरांप्रमाणे राज्याच्या कोट्यातूनच लस मिळाल्याचं उघड झालं आहे.

दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्याला शनिवारी फक्त एक लाख डोसचा पुरवठा झालाय. यात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर इतरही जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी 35 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 17 हजार अशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या लसींमध्ये काही भाग हा ग्रामीण भागासाठीही राखीव असणार आहे.त्यामुळं श्रेय घेण्याच्या नादात पुण्याच्या महापौरांनी केलेले दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे. नंतर सारवासारव करताना महापौरांनी ‘येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं’ असं म्हणत वेळ मारुन नेली आहे.

पुण्यातील बहुतेक लसीकरण केंद्र शनिवारी देखील बंदच राहिली. शुक्रवारी लस संपल्याने ठप्प झालेलं लसीकरण शनिवारी दुपारपर्यंत सुरु होऊ शकलं नाही. रात्रीत पाठवण्यात आलेले डोस लसीकरण केंद्रांवर पोहोचल्यावर दुपारनंतर संथ गतीनं या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र मागणीच्या तुलनेत लसींची संख्या अतिशय कमी असल्यानं लसीचा हा साठा लगेच संपला.

पुणे जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची देशातील विक्रमी संख्या नोंद होत असताना गेल्या दिवसांपासून इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत पुणे जिल्ह्यात दररोज 80 ते 85 हजार लोकांना लस दिली जात होती. मात्र लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने हे प्रमाण 50 ते 55 हजारांवर येऊन पोहचलं होतं. त्यामुळे पुण्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट अडीच लाख लसीचे डोस मिळाल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टाई कामाला आल्याचंही मोहोळ यांनी म्हटलं होतं.

प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील मुंबई , सातारा आणि सोलापूर या इतर शहरांप्रमाणेच शनिवारी रात्री केंद्राकडून लसीचा पुरवठा करण्यात आला

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.