महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार? सर्वपक्षीय बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे.या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन  आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.त्याशिवाय दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातही निर्णय़ घेतला जाणार आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा उंचावता आलेख पाहता या पार्श्वभूमीवर येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ प्रशासन घेणार का, यासंदर्भातील धाकधूकही अनेकांनाच लागली आहे. त्यामुळं शनिवार या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी महत्त्वाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

लोकल ट्रेनलाही ब्रेक

पुढच्या लॉकडाऊनमध्ये कदाचित मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण, लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना परसतोय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यातच लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल बंद करण्याचा विचारही सरकार करत असल्याचं बोललं जात आहे.

एकूणच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या निर्बंधात सूट तर नाही, मात्र निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात. मात्र, हे करत असताना सामान्यांच्या जीवनावर कमीत कमी परिणाम होईल, अर्थचक्र धीम्या गतीने का होईना फिरत राहिल, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे

राज्यात वीकेंड लॉकडाऊन 

कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरु राहणार असून, सुपरमार्केट मात्र बंद असणार आहेत. तर, कोणालाही कारणाशिवाय प्रवासाची मुभा नसेल.

MPSC परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा  एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत  असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.