पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक, ३ रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त

पिंपरी चिंचवड : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पिंपरी चिंचवड सामजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ती ३ रेमडिसिवीर इंजेक्शन, १० हजार ४०० रुपये रोख रक्कम, एक टिव्हीएस दुचाकी आणि ०४ मोबाईल असा एकुण १ लाख ७४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आदित्य दिगंबर मैदगी (वय २४ रा. आंबेडकर चौक, पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (वय २४ रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), अजय गुरुदेव मोराळे (वय २५, समता नगर, सांगवी), मुरलीधर सुभाष मारुटवकर (वय २४, हायस्ट्रीट होस्टेल, बाणेर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेशातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यानी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडुन मिळाली. त्यानुसार बनावट गि-हाईक बनवून अवैधरित्या रेमडिसिव्हर इंजेक्शन अधिक दराने विकणारा आदित्य दिगंबर मैदगी याला मोबाईलवर संपर्क साधुन इंजक्शन बाबत विचारणा केली. त्याने त्याच्याकडे २ इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगुन एका इंजक्शनची किंमत ११,०००/- रुपये असे दोन इंजक्शन करीता २२,०००/- रुपये घेऊन सांगलीतील बॅडमिंटन हॉल समोर येण्यास सांगितले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथक व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी संयुक्तरित्या सापळा रचून आदित्य दिगंबर मैदगी याला इंजक्शन विकताना पकडून त्याच्याकडून दोन रेमडिसिवीर इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले.

या इंजक्शन बाबत आरोपी मैदगीकडे विचारणा केली असता त्याने इसम प्रताप सुनिल जाधवर (वय २४ वर्षे रा. तळेगांव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे) याचेकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर प्रताप जाधवर याला ताब्यात घेवुन त्याच्याकडून ०१ रेमडिसिवीर इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले. सदर इंजेक्शन बाबत माहिती घेतली असता त्याने आदित्य मैदगी याच्याकडे विक्री करीता दिलेले ०२ इंजेक्शन हे अजय गुरुदेव मोराळे (ब्रदर) मेडीपॉईंट हॉस्पीटल, औंध याच्याकडुन विकत घेतल्याचे सांगितले. अजय गुरुदेव मोराळे यास मेडीपॉईंट हॉस्पीटल, औंध येथुन ताब्यात घेवुन सदर तीन इंजेक्शन बाबत विचारणा केली असता त्याने मुरलीधर सुभाष मारुटकर यांचेकडुन तीनही इंजक्शन विकत घेतले असल्याचे सांगितले. तो बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये ब्रदर म्हणुन काम करतो. त्याने बाणेर कोव्हीड सेंटर येथुन सदरचे इंजेक्शन हे बाहेर विक्री केल्याचे सांगितले.

या आरोपींकडून ०३ रेमडिसिवीर इंजेक्शन, १० हजार ४०० रुपये रोख रक्कम, एक टिव्हीएस दुचाकी आणि ०४ मोबाईल असा एकुण १ लाख ७४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी श्रीमती भाग्यश्री यादव, विवेक खेड़कर यांनी केली आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.