राज्यात १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज, कोविड टास्क फोर्सचं मत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  टास्क फोर्सची बैठक बोलावलीय. बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे. ही बैठक अजून सुरु आहे.

 

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे.

लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता

लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.

लॉकडाऊनसाठी सर्वांच्या मनाची तयारी झाली -राजेश टोपे

राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.  राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.

 

लॉकडाऊनला पर्याय नाही- मुख्यमंत्री
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता  लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले.  सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

 

…नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर- मुख्य सचिवांचा इशारा 
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा काल मुख्य सचिवांनी दिला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.