14 एप्रिलला अनिल देशमुखांच्या चौकशी, सीबीआयने पाठवला समन्स

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर एका पाठोपाठ एक अडचणी येत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोंडी झाली आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम राखत सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवरील आरोपांच्या CBIचौकशीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. 14 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.

CBIकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची येत्या १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर ही चौकशी करण्यात येणार आहे. याच CBIचौकशीच्या निर्णयामुळे अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही रविवारी जबाब नोंदवले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही रविवारी जबाब नोंदवण्यात आलेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची सुमारे चार तास चौकशी केली, त्यानंतर त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडून आता अनिल देशमुख यांनाही समन्स पाठवण्यात आला असून, त्यांनाही चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने CBIचौकशीचा आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली होती. याठिकाणी त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात देखील अनिल देशमुखांना दणका मिळाला.

परमबीर सिंह यांचा आरोप

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबानं केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती.

सचिन वाजे आणि मीना जॉर्ज याची डायरी सीबीआयच्या ताब्यात

सीबीआयने सचिन वाझेच्या केबिनमधून मिळालेली डायरीही सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीत त्याच्या सर्व वसुलीचा रेटकार्डचा उल्लेख आहे. तसंच कोणासोबत किती रुपयांचा व्यवहार झाला ही बाबही नमूद करण्यात आली आहे. तर सचिन वाझे यांची निकटवर्ती महिला मीना जॉर्जच्या घरातूनही एनआयएला डायरी मिळाली होती. ती डायरही सीबीआयने एनआयएकडून आपल्या ताब्यात घेतली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.