राज्यात उद्या रात्री 8 पासून पुढचे 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वाहतुकीत मोठा वेळ जात आहे. त्यासाठी लष्कराच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठीही पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे वैद्यकीय सुविधेवर भार पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.

लोकल, बससेवा सुरू राहतील

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीव्हरी, टेक अवे सेवा!

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.

अन्नसुरक्षेअंतर्गत ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत

राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती ५ रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण २ लाख थाळ्या देत आहोत. गोरगरीबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.

फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगारांनाही अर्थसहाय्य

महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देत आहोत. यांची संख्या १२ लाखांपर्यंत आहे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी १५०० रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे. १२ लाख परवानाधारक शेतकऱ्यांना १५०० रुपये एकवेळचे आपण देत आहोत. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये देत आहोत.

जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी ३ हजार ३०० कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आलं आहे. साधारणपणे एकूण ४०० कोटींच्या या योजना आपण या माध्यमातून करत आहोत.

हे सगळं मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलं आहे. कुठेही लपवाछपवी नाही. नाईलाजाने ही बंधनं टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधनं आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधनं मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामाग फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा.

संचारबंदीत काय चालू काय बंद

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू
कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार
लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- उद्या रात्री ८ वाजल्यापासून अंमलबजावणी
– उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी
– पुढील १५ दिवस संचारबंदी
– येणे जाणे पूर्ण बंद
– आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
– सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
– त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार
– वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
– शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
– बँका, आर्थिक संस्था,  अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
– बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
– रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
​ लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत
– सात कोटी लोकांना मोफत धान्य

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.