लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख
मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. देशात रोज १ लाखांच्या पुढे आता रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही रोज ५० ते ६० हजारांच्या मध्ये नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच, देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ल़ॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊन बाबत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. शिवाय येत्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचाचं सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अधिक वेळ न दवडता आता अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा विश्वास देत शेख यांनी शासनाकडून नवी एसओपी लागू करण्यात येण्याची बाब स्पष्ट केली. मागील लॉकडाऊनच्या वेळी अचानकच काही निर्णय घेतले गेल्यामुळं काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी कोरोनापेक्षाही परिस्थितीचा अधिक त्रास नागरिकांना झाला होता. त्यामुळं त्या चुका टाळण्याबाबतही यंत्रणांमध्ये चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
सण- उत्सवांच्या उत्साहावरही काही मर्यादा आल्या आहेत. पण, नादरिकांनी सध्या पिरिस्थिती पाहता कोरोना काळात नियमांचं पालन करणं अपेक्षित असल्याचं म्हणत हे नियम तात्पुरते असून, त्यांचं योग्य पद्धतीनं पालन झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असा सूर आळवला.
तसेच, मुंबईत बाहेरुन येणाऱ्या लोकांवर काही निर्बंध लावले जाऊ शकतात असंही शेख म्हणाले आहेत. तसेच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार आजच निर्णय जाहीर करेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. तसेच, देशातील वाढत्या कोरोना संख्यांवर बोलताना ते म्हणाले की, कुंभमेळ्यामुळे देशात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे लवकर यावर आळा घालणे गरजेचे आहे, असेही मत असल्म शेख यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या टास्क फोर्समधील काही जणांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. काही जणांनी एवढ्या लॉकडाऊनमुळे त्रास होईल असे म्हटले होते. काही जणांनी १४ दिवसांच्या तर काही जणांनी ८ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करावी असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहोचले जात आहे. मात्र काही राज्ये कोरोनाचे रुग्ण लपवत आहेत. त्यांच्याकडे १५ दिवसांनंतर बिकट परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!