कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या श्री मोरया हॉस्पिटल येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.विशेष म्हणजे, कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये एकूण 22 कोविड 22 रुग्ण होते, त्यात 6 ऑक्सिजन बेडवर, 2 व्हेंटिलेटरवर तर आज सकाळी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महेमुद फारुक शेख (रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स ,कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मूळ गाव पीर बुर्‍हाणनगर नांदेड ता. जिल्हा नांदेड) या बनावट डॉक्टरला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या बोगस डॉक्टरचे शिक्षण 12 वी नापास असल्याची माहिती पुढे येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कारेगाव येथील मेहमूद फारुक शेख याने महेश पाटील नावाने बोगस सर्टिफिकेट घेऊन तो महेश पाटील नावाने श्री मोरया नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याबाबतची खबर डॉ.शीतलकुमार राम पाडवी या त्यांच्याच पार्टनरने स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना दिली होती.

सदरचा हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते यांनी पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांना सूचना दिल्या होत्या. त्यांनी  त्यानुसार येथील उपनिरीक्षक अमोल गोरे, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार निलेश कदम, महेश गायकवाड, दत्‍तात्रय तांबे, जनार्दन शेळके, पोलीस नायक विजय कांचन, गुरु जाधव,मंगेश थिगळे, अजित भुजबळ यांचे पथक तयार करून शिरूरला रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने श्री मोरया हॉस्पिटल येथे डॉक्टर व्यवसाय करणारे मेहबूब फारुक शेख (मुळगाव- पीर बु-हानगर, नांदेड) यास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता तो कारेगाव येथे महेश पाटील नावाने वावरत असल्याची तसेच महेश पाटील (एम.बी.बी.एस) या नावाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून या प्रमाणपत्राच्या आधारे श्री मोरया हॉस्पिटल नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टाकून त्यात दोन वर्षापासून रुग्णांवर उपचार करून रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. त्याने महेश पाटील नावाने बनावट आधार कार्ड व शिक्के देखील बनवून घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.