अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (१४ एप्रिल) सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे.अनिल देशमुख यांना जबाब नोंदवण्यासाठी सकाळी ११ वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

याआधी अनिल देशमुख यांच्या २ स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची झाडाझडती घेण्यात आली होती. तसेच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याकडूनही सीबीआयने चौकशी करत माहिती घेतली होती. या सगळ्या माहितीच्याआधारे सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहेत. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक आणि महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आजच्या अनिल देशमुख यांच्या चौकशीत आणखी कोणते नवे खुलासे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात 31 मार्चला युक्तिवाद

मुंबई उच्चन्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने अनिल देशमुख  यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ३१ मार्चला युक्तिवाद झाला होता.

काय आहे परमबीर सिंह – अनिल देशमुख प्रकरण

परमबीर सिंह आणि अनिल देशमुख वाद मुळात नव्हताच. परमबीर सिंह हे सुरुवातीला कर्तव्यदक्षच अधिकारी होते. त्यांच्या कामावर गृहमंत्र्यांना आणि राज्य सरकारला खूप विश्वास होता. मग असा अधिकारी हाताशी असताना माशी कुठे शिंकली असा प्रश्न आता तुम्हाला आला असेल. यासाठी आपल्याला थोड पाठी जावे लागेल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाजवळ जेलिटीनच्या कांड्या एका स्कॉर्पिओ गाडीत  सापडल्या होत्या.

या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सचिन वाझे यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात आल्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेंचं निघाले. अकर्तृव्य पोलीस या गोष्टींसाठी जबाबदार असल्याचा आरोप करत राज्यात पोलिसांच्या बदलींचे सत्र फिरलं. यात परमबीर यांचाही नंबर लागला. स्फोटके सापडल्या प्रकरणी  परमबीर जबाबदार धरत त्यांची गंच्छती होत त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवून होमगार्ड आयुक्त करण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला. यात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप लावला.

परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली 

सुरुवातीला परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार देत परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांच्या वतीने वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली होती. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनीदेखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आणखी तीन याचिकांवरही सुनावणी झाली होती.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली होती. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात होता. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.