विकृतीचा कळस! भिवंडीत एकतर्फी प्रेमातून चाकूने तरुणीचे ओठ कापले

भिवंडी:  दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. नुकतेच एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने साथीदाराच्या मदतीने चाकूने तरुणीचे ओठ कापल्याची घटना उघड झाली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुक्तार अब्दुल रहीम अंसारी ( वय २३ , रा . किडवाई नगर ) व शाहीद अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,मुक्तार याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर मुक्तार अब्दुल रहीम अंसारी यांचे प्रेम होते. तो तिचा गेल्या एक वर्षापासून सातत्याने पाठलाग करत होता. मात्र, तरुणी त्याला सातत्याने नकार देत होती. सदर मुलगी नकार देत असल्यामुळे त्यांनी तिला धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.

‘मुक्तारचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा, अशी धमकीही त्याने दिली होती. प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने अनेकदा धमक्याही दिल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, नऊ एप्रिलला पीडित तरुणी सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार व त्याच्या साथीदाराने तिला गाठले. त्यावेळी मुक्तारच्या साथीदाराने मुलीला जबरदस्तीने पकडून ठेवले व मुक्तारने चाकूने मुलीच्या ओठांवर वार करत ओठ कापले. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातीला शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र ओठांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने डॉक्टरांनी तिला केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सध्या तिच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुक्तार व शाहीद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, दोन्ही आरोपी फरार असून सध्या त्यांचा शोध सुरु आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.