औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्ही व्हिडिओमधून नवा खुलासा

औरंगाबाद :पोलिसांच्या मारहाणीत औरंगाबादमध्ये सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत काल उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र आता या घटनेत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर दुखापत हे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र सलून चालक फिरोज खान हे पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन पडल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे. तसंच फिरोज खान यांना पोलिसांनी मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही. या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे आता या घटनेनं नवं वळण घेतलं असून यापुढे आणखी काय खुलासा होतो, हे पाहावं लागेल.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोरोनामुळे जिल्ह्यातील सामान्यांची परिस्थिती भयानक होत आहे. अशात शासनाच्या आदेशामुळे व्यापारी, दुकानदार आणि इतर लोकांना त्यांची दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. शहरात सगळीकडे दुकाने बंद आहेत. या काळात उस्मानपूरा भागातील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.दुकान सुरू असल्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली.

कारवाईनंतर सलून चालकाला पोलिस स्टेशनला घेऊन जाताना त्याचा त्यातच मृत्यू झाला. यानंतर सलून चालकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप केला  होता. कारवाई केलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती आणि उस्मानपूरा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.