धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत, प्रचंड खळबळ

औरंगाबाद : गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे प्रेत कुजलेल्या व झाडाला लटकलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. 13)  आढळून आला. कन्नड जवळील चंदन नाल्याजवळ ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

भगवान प्रभाकर पवार (वय 23 रा. खातखेडा ता.कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता.

कन्नड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुले मंगळवारी (दि.13)  संध्याकाळी साडेपाच वाजता कन्नड-पिशोर रस्त्यावरील चंदन नाल्याजवळ करवंद गोळा करण्यासाठी डोंगरावर गेले होते.  त्यावेळी सागाच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला. या मुलांनी तात्काळ ही माहिती कन्नड पोलिसांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक राऊत, हेड कॉन्स्टेबल अहिरे, पो. ना. बर्डे, पो. ना. सुरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. तपासात घटनास्थळी एका बॅगमध्ये आधार कार्ड व इतर काही साहित्य आढळून आले. आधार कार्ड वरील नोंदीवरून हा मृतदेह भगवान प्रभाकर पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी खातखेडा येथे संपर्क साधला असता हा तरुण 25 जानेवारीला कन्नडला गाडीवर कामाला जातो असे सांगून गेला होता. परंतु 30 जानेवारी पर्यंत घरी आला नाही, कामावर गेलेला नव्हता आणि त्याचा मोबाईल सुद्धा बंद असल्याने त्याचे वडील प्रभाकर संपत पवार यांनी पिशोर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केलेली होती अशी माहिती प्राप्त झाली.

मंगळवारी अचानक बेपत्ता तरुणाचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या तरुणाच्या घरच्यांना धक्का बसला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. कन्नड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.