खळबळजनक ! तहसील कार्यालयातच तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा : तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहातच एका तलाठ्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. 15) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

अनिल अंभोरे असे आत्महत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. अंभोरे हे नांदुरा तहसील कार्यालयातच कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अंभोरे यांनी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते.रस्त्यात एका वाहन चालकास त्यांनी चाकूचा धाक दाखवत थांबवून नांदुरा तहसील कार्यालयात पोहचवण्यास भाग पाडले. त्या वाहन चालकाने त्यांना तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंत पोहचवले. सकाळची वेळ असल्यामुळे कर्मचा-यांची संख्या अतिशय कमी होती. तलाठी अंभोरे यांनी आल्या आल्या थेट तहसीलदारांच्या केबीनमधील बाथरुममधे प्रवेश केला. सोबत आणलेल्या दोरीचे एक टोक खिडकीला व दुसरे टोक स्वत:च्या गळ्याला बांधून आत्महत्या केली.

दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच नांदुरा शहरात खळबळ माजली. मयत तलाठी अनिल अंभोरे यांच्याबद्दल कामाच्या बाबतीत शेतकरी वर्गाच्या ब-याच तक्रारी असल्याचे लोकांच्या चर्चेतून उघड झाले. जनतेच्या कामात ते दुर्लक्ष करत होते असे समजते. भाड्याच्या घरात राहणारे अंभोरे यांचे मुळगाव घाटबोरी ता. मेहकर होते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.