खळबळजनक ! बुलढाण्यात एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्या

बुलडाणा : बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षिय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवरात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याचे व अंगावर चटके दिल्याच्या खूणा आहेत.त्यामुळे तिचा खून झाला असल्याचा कयास व्यक्त केला जात असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार,.मृत माधुरी मोरे यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे.  माधुरी बुलडाणा आगारात वाहक या पदावर कार्यरत होती. दोन दिवसांपूर्वी तिचे आपल्या वडिलांसोबत बोलणे झाले होते. त्यावेळी साखळी या ठिकाणी आपल्या मावशीच्या घरी मुक्कामी असून, साप्ताहिक सुट्टी असल्याने ती घरी परतणार होती. मात्र, सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांना या तरुणीचा मृतदेह आढळला. आपल्या गावातील तरुणीचा मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर गावात खळबळ उडाली. तिच्या गळ्यावर आणि हात, पायावर चाकूने वार केलेले होते. तर शरीरावर चटके दिल्याच्या खुणा होत्या. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटलांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली. तरुणीच्या गळ्यावर, हात आणि पायांवरील जखमांवरून तिचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण केले. घटनेचा पंचनामा केला. मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतरच हे स्पष्ट होणार आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.